*‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी* · सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने राहणार सुरु · सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी वाशिम, दि. २१ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी ३१ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाने राज्यात रेड झोन व नॉन रेड झोनच्या अनुषंगाने सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात २२ मेपासून ‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. त्यानुसार सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई करण्यात आली असून या काळात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दुध संकलन व विक्री, भाजीपाला विक्रीच्या वेळा यापूर्वीप्रमाणेच कायम राहतील. सर्व आस्थापनाधारक, दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ मीटरचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी, तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना आस्थापना अथवा दुकानात प्रेवेश देवू नये. व्यक्तींच्या संपर्कात येणारी ठिकाणे, वस्तूंचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे. हॅण्डवॉश, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर इत्यादी बाबींची तजवीज संबंधित आस्थापना, प्रतिष्ठान यांनी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्यास अथवा अशा ठिकाणी गर्दी आढळून आल्यास या आस्थापना, दुकाने बंद करण्यात येतील. सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन या अटींसह महारष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्हांतर्गत बस वाहतूकीस ५० टक्के क्षमतेसह वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंन्टेन्टमेंट झोन अर्थात प्रतिबंधीत क्षेत्रात ही सूट लागू राहणार नाही. *जिल्ह्यात ह्या सेवा राहणार प्रतिबंधित :-* सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वेने सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतुकीवर बंधने राहतील. कोणत्याही रेल्वेने प्रवाशांची वाहतूक करता येणार नाही. सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहतील. ऑनलाईन अथवा दूरस्थ शिक्षणाकरिता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. ज्या हॉटेलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस, शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी वास्तव्यास आहेत, अशांसाठी तसेच अलगीकरण व्यवस्था केलेली हॉटेल सुरु राहतील. रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवा आरोग्य खात्याच्या, गृह खात्याच्या व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी करिता तसेच अलगीकरण व्यवस्थेसाठी सुरु राहतील. इतरांसाठी बंद राहतील. बस स्थानक, रेल्वे स्थानक येथील कॅन्टीन व्यवस्था सुरु राहील. रेस्टॉरंटला अन्नपदार्थ घरपोच करण्याची मुभा राहील. सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशियम, थिएटर, ऑडीटोरियम, सेमिनारचे ठिकाण, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, बार, असेंब्ली हॉल पूर्णपणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे अथवा पुजेची ठिकाणे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषदा, धार्मिक मेळावे भरवित येणार नाहीत. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यावर बंदी असेल. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई असेल. याशिवाय ६५ वर्षावरील व्यक्ती, गरोदर स्त्रीया, १० वर्षाखालील मुले यांनी घरातच थांबावे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव परवानगी राहील. नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा, दुपट्टाचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन, पण व तंबाखू खाण्यास प्रतिबंध राहील. *जिल्ह्यात ह्या सेवा सुरु राहणार -* सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने, कृषि विषयक सर्व सेवा, बँक, खासगी बांधकामे, माल वाहतूक, शहरी व ग्रामीण भागातील उद्योग, ई-कॉमर्स सुविधा, खासगी आस्थापना, कुरीअर, पोस्टल सेवा, रेस्टॉरंटमधून होम डीलीव्हरी करण्यास परवानगी आहे. तसेच केशकर्तनालये, स्पा सुरू राहतील. यापुढे सर्व आस्थापना, प्रतिष्ठाने, सेवा इत्यादीसाठी परवानगीची अथवा पासेसची आवश्यकता राहणार नाही. एका व्यक्तीसह दुचाकी, चालक व दोन व्यक्तींसह वाहतूक करण्यास तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना परवानगी राहील. विवाह समारंभ जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीने करता येईल. मात्र, विवाह समारंभामध्ये सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी राहील. सर्व सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीच्या साधनांमध्ये सोशल डिस्टसिंग बंधनकारक करण्यात आले आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, मोकळी मैदाने व्यायामासाठी व्यक्तींना खुली राहतील. व्यायामासाठी जाणाऱ्या व्यक्तींनी सोशल डिस्टसिंग पाळणे बंधनकारक राहील. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मैदानांवर सामुहिक खेळ खेळण्यास बंदी राहील. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासनाची महामंडळे १०० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरु राहतील. या कार्यालयांची कामे नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत सुरु करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची राहील. सर्व शासकीय कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करावे. तसेच सर्व नागरिकांनीही त्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी कळविले आहे. *****
Publisher Information
Contact
karanjahunkar.gn@gmail.com
9623194226
AT POST KHANAPUR KARNJA LAD-444107
About
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn